नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरची पत्रकार याना मीर हिने ब्रिटनच्या संसद भवनात पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तिथे आपण पूर्णपणे सुरक्षित आणि मुक्त आहोत.
त्यामुळे केंद्रशासित प्रदेशातील लोकांमध्ये फूट पाडणे थांबवावे, असे आवाहन तिने आंतरराष्ट्रीय माध्यमांना केले आहे. तसेच मलाला माझ्या मातृभूमीची बदनामी करत असल्याचा आरोपही तिने केला आहे. ब्रिटीश संसदेने आयोजित केलेल्या ‘रिझोल्यूशन डे’मध्ये याना मीर हिने हे वक्तव्य केले.
‘रिझोल्यूशन डे’मध्ये बोलताना याना मीर म्हणाली की, मी मलाला युसूफझाई नाही. मी माझ्या भारतात मुक्त आणि सुरक्षित आहे. माझी मातृभूमी काश्मीर भारताचा भाग आहे. मला कधीही पळून जाऊन तुमच्या देशात आश्रय घेण्याची गरज भासणार नाही. मी मलाला युसुफझाई कधीच होणार नाही. जिला दहशतवादाच्या गंभीर धोक्यांमुळे आपल्या देशातून (पाकिस्तान) पळून जावे लागले. परंतु भारत नेहमीच दहशतवादी शक्तींविरुद्ध मजबूत आणि एकजूट राहील, असा विश्वास याना मीर हिने यावेळी व्यक्त केला.
मलालाकडून माझ्या मातृभूमीची बदनामी
याना मीर म्हणाली की, मलालाच्या वक्तव्यावर माझा आक्षेप आहे, कारण मलाला स्वत:ला पीडित ठरवून माझ्या पुरोगामी मातृभूमीची बदनामी करत आहे. सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमातील अशा सर्व सदस्यांवर माझा आक्षेप आहे, ज्यांनी कधीही भारतातील काश्मिरला भेट देण्याची तसदी घेतली नाही. पण, तिथल्या दडपशाहीबद्दल हे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा रचत आहेत.
भारतीय समाजाचे विभाजन होऊ देणार नाही
याना मीर म्हणाली की, मी तुम्हाला धर्माच्या आधारावर भारतीयांचे ध्रुवीकरण थांबवण्याची विनंती करते. आम्ही तुम्हाला आमच्यात फूट पाडण्याची संधी देणार नाही. या वर्षी प्रतिज्ञा दिनानिमित्त, मला आशा आहे की, ब्रिटन आणि पाकिस्तानमध्ये राहणारे गुन्हेगार आंतरराष्ट्रीय माध्यम किंवा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मंचांवर माझ्या देशाची बदनामी करणे थांबवा. कारण दहशतवादामुळे हजारो काश्मिरी मातांनी आपले मुलांना गमावले आहे. त्यामुळे माझ्या काश्मिरी समाजाला शांततेत जगू दे, अशी विनंती याना मीर हिने केली आहे.
याना मीरला मिळाला पुरस्कार
दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान, याना मीरला जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील विविधता जपल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय, तिने या कार्यक्रमात कलम 370 रद्द करण्याच्या योजना, उत्तम सुरक्षा, सरकारी उपक्रम आणि निधी वाटप यावर प्रकाश टाकला. विशेष म्हणजे तिने काश्मिरमधील कट्टरता दूर करण्यासाठी भारतीय लष्कराच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.