मुंबई : निवडणुकीच्या कामामध्ये शिक्षकांना गुंतवले जात असतानाच आता नुकत्याच पार पडलेल्या मराठा सर्वेक्षणातही त्यांना कामाला होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे हे शिक्षकांच्या बाजूने उभे राहिले.
त्यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका मांडत, शिक्षकांना अशैक्षणिक कामात जुंपू नका आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या कामासाठी पर्यायी यंत्रणा उभारावी. तसेच शिक्षकांनी शासनाचे काम केले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली तर आम्ही बघून घेऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता निवडणूक आयोग नरमल्याचे यला मिळत आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पत्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. यात त्यांनी म्हटले की, शालेय शिक्षकांना निवडणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हा मुद्दा चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर मांडला होता. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेऊन “कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये” अशी भूमिका आग्रहपूर्वक मांडली आणि केवळ शिक्षकांवर अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्था उभारताना माजी शासकीय कर्मचारी आदींनाही सामावून घ्यावे, अशी सूचना केली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आग्रहामुळे काल रात्री उशिरा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी “मुंबईचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तातडीची बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी अधिगृहीत करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा” असा आदेश दिला आहे. इच्छुक सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्यूटी देण्याबाबतचा पर्याय वापरण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, “शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस निवडणुकीशी संबंधित कामावर नियुक्त केल्यास त्यांना त्यांच्या शैक्षणिक कामाच्या दिवशी व वेळेस निवडणुकीचे काम दिले जाणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात यावी” असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे आता यापुढे निवडणुकीच्या दिवसांतही शिक्षक वर्गात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिकवू शकतील! राज ठाकरे यांच्या मनसेने त्वरित हस्तक्षेप केल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त ताण आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखता येण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने खुला झाला, याचे समाधान वाटत असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.