जैतापूर / वार्ताहर:-जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान स्वरूप संप्रदायातर्फे संपूर्ण अन्य पाच राज्यांमध्ये 854 कॅम्प मध्ये महा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात असून 10 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत सुमारे एक लाख बाटल्या रक्त संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
याचाच भाग म्हणून राजापूर तालुक्यातील धारतळे ,जैतापूर आणि पाचल या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी घेण्यात आलेल्या या शिबिराला परिसरातील जवळपास शंभर ते दीडशे रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता.
जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आधार ब्लड सेंटर इचलकरंजी यांच्या सहकार्यातून या शिबिराचे जैतापूर येथे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून राष्ट्राची सेवा करावी असे आवाहन नानीज पिठाच्या वतीने करण्यात आले आहे.
जैतापूर येथील शिबिर यशस्वी करण्यासाठी आणि पिठाच्या व जिल्हा सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली तालुका पदाधिकारी आणि सेवेकरांनी मेहनत घेतली.
पाचल येथे 25 फेब्रुवारी 2024 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.