जैतापूर/राजन लाड:-राजापूर तालुक्यातील बाकाळे येथील सुनबाई तोऱ्यात नाट्यप्रयोग शिवाजी मंदिर मुंबईच्या रंगमंचावर होणार आहे. रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 8 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे सादर होणार नाट्यप्रयोग…
ग्रामीण भागातील कलाकारांना मोठ्या रंगमंचावर कला सादर करण्याची संधी…ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर लिखित सुनबाई तोऱ्यात या दोन अंकी नाटकाचा ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन साकारलेला नाट्यप्रयोग महाराष्ट्रातील एक नंबरच्या नाट्य मंदिरात म्हणजेच मुंबई शिवाजी नाट्य मंदिरात होणार आहे. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील बाकाळे येथे श्री देव गणेश कृपा प्रसादिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर लिखित आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुनबाई तोऱ्यात या नाटकाचा पहिला प्रयोग जि .प .शाळा बाकाळेच्या रंगमंचावर पार पडला होता.
बाकाळे सारख्या ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून नाट्य चळवळ जोपासली जात असून दरवर्षी स्थानिक कलाकार एक नाटक सादर करत असतात. यावर्षी वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनीच लिहिलेल्या सुनबाई तोऱ्यात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर आपल्या माडबन या गावी मुक्कामी आल्यापासून ग्रामीण भागात चळवळ सुरू ठेवली आहे.
यापूर्वी त्यांनी स्थानिक कलाकारांना घेऊन साकारलेले संगीत विठ्ठल विठ्ठल हे नाटक थेट विठुरायाच्या पंढरपुरात देखील सादर करण्याची संधी स्थानिक कलाकारांना मिळवून दिली होती.
तर आपल्याच संगीत वस्त्रहरण या नाटकाचा स्थानिक कलाकारांच्या संचातील नाट्यप्रयोग स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थांच्या सहकार्याने मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
आता बाकाळे येथील नवख्या स्थानिक कलाकारांच्या संचातील नाटक साकारण्याबरोबरच स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांना मुंबईतील भव्य नाट्यगृहात नेऊन हाउसफुल गर्दीत सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत ग्रामीण भागात ही नाटकाची चळवळ समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या नाटकाचे दिग्दर्शन सुरेश चेऊलकर , संगीत सागर कणेरी सचिन कणेरी, नेपथ्य अंकुश कांबळी आणि सहकारी रंगभूषा उल्लेष खंडारे, ध्वनी आणि प्रकाश श्रीनिवास तारकर तर या नाट्यप्रयोगाचे व्यवस्थापन बाकाळे आणि काजुरमळी स्थानिक आणि मुंबई स्थित ग्रामस्थांनी केले आहे. तर पत्रकार राजन लाड यांसह राकेश दांडेकर सुनील करगुटकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या नाटकामध्ये सुरेश चेऊलकर, अजयकुमार रांबाडे, चेतन रांबाडे, केतन रांबाडे, रुपेश चव्हाण, महेंद्र पोवार ,प्रमोद पोवार सौ .मंजिरी कणेरी, सौ .चित्रा रांबाडे आणि कुमारी आकांक्षा पंगेरकर यांनी भूमिका साकारल्या होत्या.
मुंबई येथे भरत कणेरी ,अनंत पाळेकर ,संजय रांबाडे यांसह त्यांचे सर्व सहकारी तसेच बाकाळे आणि काजूरमळी स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे 25 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या या नाट्यप्रयोगासाठी पूर्ण झाली असून हाउसफुल गर्दीत हा प्रयोग साकार होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे .
45 वर्षांपूर्वी आपल्या वस्त्रहरण या नाटकाचा शुभारंभ 15 फेब्रुवारी 1980 ला सायंकाळी साडेसात वाजता याच शिवाजी मंदिर मध्ये झाला होता. या शुभारंभाच्या प्रयोगात आपण पांडू तात्या सरपंच ही भूमिका साकारली होती. त्याच नाट्यगृहामध्ये माझ्या ग्रामीण भागातील कलाकारांना प्रयोग सादर करण्याची संधी मिळते आहे याचा मनस्वी आनंद आहे. ग्रामीण भागातील कलाकारांनीही वस्त्रहरण प्रमाणेच प्रेक्षकांचे मनोरंजन करावे अशा शुभेच्छा ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी दिल्या आहेत.