चिपळूण/प्रतिनिधी: लोटे येथील गोशाळेतील गायींना शासनाने चारा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वर्षभरात तिनदा उपोषण केले. आता चौथ्यांदा उपोषणाची वेळ आली. सर्वानी सोडून दिलेल्या अशा ११०० गायींचे येथे पालन पोषण केले जाते. चाऱ्या अभावी गोशाळा चालकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यामुळे चाऱ्या अभावी गायींचे जिवन संपू नये, तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केल्याचे मत भगवान कोकरे महाराज यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील गोशाळांतील गोमातांची भूक भागण्यासाठी शासनाने तत्काळ चारा उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी भगवान कोकरे महाराज यांनी गुरूवार पासून लोटेतील गोशाळेत आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना कोकरे महाराज म्हणाले, राज्यातील २०-२५ गोशाळा सोडल्यास सर्वाची दयनीय अवस्था आहे. गायींना चारा देता येत नसल्याने गोशाळा चालकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. शासनाने गायींना चारा उपलब्ध करून द्यावा, हीच मागणी आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वर्षभरात चार वेळा उपोषण केले. पोलिसांनी पकडलेल्या, नागरिकांनी सोडून दिलेल्या अशा ११०० गायींचे येथे जतन केले जाते. सध्या एका कुटुंबाला दोन चार गायी सांभाळणे देखील शक्य होत नाही. दुष्काळामुळे मुबलक चारा नाही. चाऱ्यापोटी २५ लाखाचे अनुदान शासनाकडेच लटकलेले आहे. त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला तरी सातत्याने आश्वासनेच दिली जातात. गोमातेचे जतन करणाऱ्या या गोशाळांना शासनाने चारा उपलब्ध करून द्यायला हवा. येत्या अधिवेशनात राज्य सरकार यावर विचार करून मार्ग काढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र तोडगा न निघाल्यास कळबंस्ते येथील पशुसंवर्धन कार्यालया समोर गायी सोडण्याचा इशारा कोकरे महाराजांनी दिला.
गेल्या दोन वर्षापासून गोशाळेला व्यावसायीक दराने विजपुरवठा केला जात आहे. सध्या २ लाख ६० हजार बिल भरण्याचे आदेश महावितरणकडून देण्यात आले होते. मात्र कोकरे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. विजपुरवठा खंडीत करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चाऱ्याची मागणी मान्य होईपर्यत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कोकरे महाराजांनी केला आहे. पिंपरी चिंचवड येथील स्व. आमदार लक्षण जगताप यांचे बंधू विजय जगताप व परिवाराने गोशाळेला चारा उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी दिलेल्या चाऱ्यातून दोन महिने गायींची गुजराण सुरू असल्याने कोकरे महाराजांनी जगताप परिवाराचे आभार मानले.