राजापूर:-बुधवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर असताना अचानक राजापूर आगाराकडून ग्रामीण भागातील काही बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याने परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
बुधवारपासून बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र बुधवारीच राजापूर आगाराने ग्रामीण भागातील काही एसटी बसफेऱ्या अचानक रद्द केल्या. त्यामुळे पहिल्याच पेपरला परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. अचानक एसटी बस रद्द झाल्याचे समजल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे अखेर विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घेत परीक्षा केंद्र गाठावे लागले. त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान याबाबत राजापूर आगाराशी संपर्क साधला असता एसटी संगे देवदर्शन यात्रेसाठी गाड्या सोडण्यात आल्याने तालुक्यातील चार बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये तारळ-रत्नागिरी, अणसुरे-जैतापूर, सोडयेवाडी-आजिवली, तुळसुंदे-रत्नागिरी या बसफेऱयांचा समावेश असून या पैकी अणसुरे जैतापूर गुरूवारपासून सुरू करण्यात येणार असून उर्वरित फेऱ्या शुक्रवारपासून पूर्ववत होतील, अशी माहितीही आगाराकडून देण्यात आली.