राजापूर:-तालुक्यातील धाऊलवल्ली येथे बिबट्याने दोन वर्षाच्या दोन वासरांना ठार केल्याची घटना दोन दिवसांपुर्वी घडली आहे. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण आहे.
गेले काही दिवस तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. काही दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळी राजापूर पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यात घुसून बिबट्याने एक कुत्रा पकडून नेल्याचे तेथील सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्यानंतर सौंदळ येथे रात्रीच्या वेळी शेतात कामानिमित्त बाईकवरुन चाललेल्या दिपक चव्हाण या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केले होते.
काही ठिकाणी बिबट्याने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. दोन दिवसांपुर्वी तालुक्यातील धाऊलवल्ली येथील नित्यानंद लिंगायत यांची दोन वर्षांची दोन वासरे बिबट्याने ठार केल्याची घटना घडली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी जावून प्रत्यक्ष पाहणी केली.