रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा
दिल्ली:-सामान्यांच्या दृष्टीकोनातून सुरू केलेल्या अमृत भारत ट्रेनला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी पाहता लवकरच 50 नवीन मार्गावर अमृत भारत ट्रेन सुरू होतील अशी माहिती आज, मंगळवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्ण यांनी दिली.
देशात नवी दिल्ली ते दरभंगा व्हाया अयोध्या आणि मालदा ते बंगळुरू अशा दोन अमृत भारत ट्रेन्स 30 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आला. देशातील काही मार्गांवर या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. यानंतर या ट्रेनचे नामकरण अमृत भारत ट्रेन करण्यात आले. सामान्य प्रवाशांचा या अमृत भारत ट्रेनला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. विद्यमान अमृत भारत ट्रेनला मोठे यश मिळाले आहे. म्हणूनच आता 50 अमृत भारत ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करताना म्हटले आहे. तसेच या पोस्टसोबत अमृत भारत ट्रेनचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
अमृत भारत ट्रेनला 22 डबे आहेत. द्वितीय श्रेणीचे 12 आणि सामान्य श्रेणीचे 8 डबे आहेत. याशिवाय गार्डचे 2 डबे आहेत. रेल्वेने दिव्यांगांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली आहे. यासाठी एक स्पेशल सोय करून देण्यात आली आहे. पुश-पुल तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूला इंजिन जोडण्यात आले आहे. अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये मेट्रोसारखे गँगवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतात. प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहेत. बॉटल होल्डर देण्यात आला आहे. अशा अनेक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच कवच यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरांची नजर, बायो-वॅक्युम टॉयलेट्स, सेंसरवर आधारित नळ, प्रवाशांच्या माहितीसाठी सूचना फलक, एलईडी लाइट्सचा उत्तम वापर, अशा काही गोष्टी अमृत भारत ट्रेनमध्ये दिल्या गेल्या आहेत. याशिवाय सेमी पर्मनंट कपलर्स या ट्रेनमध्ये लावले गेले आहेत. त्यामुळे गाडी सुटताना आणि ब्रेक लावल्यानंतर बसणारे धक्के बहुतांश प्रमाणात कमी होतील, असा दावा करण्यात आला आहे.