मुंबई:-वार्षिक पक्षी गणनेत मुंबईत पक्ष्यांच्या 274 प्रजाती आढळून आल्या आहेत. यापूर्वी 2023 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या होत्या.
यात मुंबई महानगर परिसरातच सुमारे 250 प्रजाती आढळून आल्या होत्या. 2022 मध्ये 250 व 2021 मध्ये 189 तसेच 2020 मध्ये 192 आणि 2019 मध्ये 234 पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या होत्या.
मुंबईसह राज्यभरात नुकतीच वार्षिक पक्षी गणना आयोजित करण्यात आली होती. या गणनेत राज्यभरातील पक्षीनिरीक्षकांनी सहभाग घेऊन पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध घेऊन त्यांची नोंद केली. या पक्षी गणनेचे निष्कर्ष एकत्रित केले जात असून लवकरच त्याची माहिती जाहीर केली जाईल अशी माहिती निसर्गतज्ज्ञ आणि लेखक तसेच या पक्षी गणना मोहिमेचे आयोजक संजय मोंगा यांनी दिली.
मुंबईतील पक्षीनिरीक्षक डॉ. सलील चोक्सी यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांच्या टीमने जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड भागात 15 किलोमीटरच्या परिसरात फेरी मारून लोखंडवाला कॉम्प्लेक्स, पवई आणि भांडुपमधील आयआयटी-बॉम्बे कॅम्पसमधील दलदलीच्या भागातील पक्ष्यांची नोंद केली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सक्रीय कार्यकर्ते असलेले डॉ. चोक्सी म्हणाले, ‘आम्ही पक्ष्यांच्या एकूण 82 प्रजाती पाहिल्या असून ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. शहराच्या सीमा वाढत आहेत आणि प्रदूषणातही वाढ होतय. तरीसुद्धा शहरी भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची विविध प्रजाती पाहणे शक्य आहे. पक्षी निरीक्षणासाठी मुंबईबाहेर जाण्याची गरज नाही.’ असं चोक्सी म्हणाले.
पक्षीनिरीक्षकांच्या टीमला अपेक्षेप्रमाणे स्थलांतरित व स्थानिक पक्षी दिसले. लोखंडवाला संकुलात कोरल टिंबा, आयआयटी कॅम्पसमध्ये जांभळा सूर्यपक्षी, जंगली घुबड, भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात रोहित पक्षी, टी. एस. चाणक्य पाणथळ परिसरात भुऱ्या रंगाचा चिखल्या ठाणे जिल्ह्यातील कर्वे पाणथळ जागेत दिसलेला काळ्या डोक्याचा खंड्या पक्षी आणि विवा पाणथळ जागेत दिसलेला भारतीय नीलपंख पक्षी ही या पक्षीनिरीक्षण अभियानातील काही ठळक वैशिष्ट्ये होती. मीरारोड येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये ‘नेचर क्लब’च्या प्रमुख असलेल्या राधिका डिसोझा या 2008 पासून अशा पक्षी गणनेत भाग घेत आहेत. त्यांनी यावेळी 40 विद्यार्थ्यांना सोबत घेत पक्षी गणनेत सहभाग घेतला होता. त्यांना एकूण 80 प्रजाती आढळून आल्या. त्या पहाटे साडेपाच वाजेपासून पक्षीनिरीक्षणाचे काम सुरू करत असत. ‘मी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विरार-वसईचा किल्ला, ठाण्याची खाडी आणि अखेरीस आयआयटी पवईतील विवा पाणथळ जागेत पक्षीनिरीक्षण केले. पक्षी निरीक्षणाचे काम करणाऱ्या अनेकांच्या सहवासात वेळ घालवल्यामुळे विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते’ असं डिसोजा यांनी सांगितले.