राजापूर:-तालुक्यातील आजिवली येथील श्री आई सुलोचना सॉ-मिलला सोमवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत सॉ- मिल मधील मशनरी सोबतच त्या ठिकाणी असलेला लाकूडसाठा जळून खाक झाला आहे. या आगीत सुमारे 42 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे मालक संजय सिताराम सुतार यांनी सांगितले.
संजय सुतार यांची आजिवली येथे श्री आई सुलोचना सॉ-मिल आहे. सोमवार असल्याने नेहमीपमाणे सॉ-मिल बंद होती. अशातच दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणाहून जाणाऱ्या काहींना सॉ-मिलला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत सॉ-मिलचे मालक संजय सुतार यांच्यासह आजुबाजूच्या लोकांना माहिती दिली. आगीची माहिती मिळताच आजिवलीसह हातदे, मिळंद, जवळेथर परिसरातील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात प्रयत्न केला. मात्र सॉ-मिलमध्ये असलेल्या लाकूड साठ्याला आग लागल्याने त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश आले नाही. या आगीत लाखों रूपये किंमतीच्या चार मशनरी, एक घर व सुमारे दोन ट्रक सागवानी लाकूड जळून खाक झाले आहे. या घटनेनंतर महसुल विभागाच्या वतीने तलाठी कुंभार यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून त्यामध्ये सुमारे 42 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.