आग्रा:-‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’; ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ज्या आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान डिवचला गेला त्याच आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटामाटात साजरी होणे हा रोमांचकारी क्षण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी ‘ज्योतिर्लिंग सर्किट’च्या धर्तीवर ‘स्वराज्य सर्किट’ची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वराज्य सर्किटची निर्मिती करावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी याच शिवजयंती सोहळ्यात बोलताना केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी लगेच प्रतिसाद देत, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्याची ग्वाही दिली.
सलग दुसऱ्या वर्षी आग्रा येथे शिवजयंती साजरी होत असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आणि आग्रा किल्ल्यात दरवर्षी अशीच उत्साहात शिवजयंती साजरी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या शिवजयंतीचे आयोजन केल्याबद्दल अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.
या शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस. पी. बघेल, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मंगेश देसाई सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर देशाचा इतिहास आणि भूगोल बदलला गेला असता. काही लोक जाती धर्मात तेढ निर्माण करत आहेत, त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवावा असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात पाऊल ठेवले ती ठिकाणे जोडणारी स्वराज्य रेल्वे सुरू करण्याचा मानसही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले की छत्रपती शिवराय म्हणजे हजारो सूर्यांची ताकद आहे. त्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी दांडपट्टा या शस्त्राला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. दांडपट्टा पूजनही यावेळी करण्यात आले.
अशा जयंती सोहळ्यांमधून शिवाजी महाराजांप्रमाणेच पराक्रम गाजवण्याची प्रेरणा आपल्याला मिळते असे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्री. बघेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
शिवजयंती सोहळ्यात बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ज्योतिर्लिंग सर्किट तयार केले तसे स्वराज्य सर्किट करावे व गड किल्ले जोडावे.
महाराज फक्त राज्यापुरते नव्हते तर देशासाठी होते म्हणून महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.