संगमेश्वर/वार्ताहर:-राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना संगमेश्वरात मात्र मनसेने लावलेल्या एका बोर्डची चर्चा सुरू आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटात राजकीय पक्षाकडून जुने रस्ते भूमिपूजन, हळदीकुंकू असे कार्यक्रमना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तुरळ येथे राजकारण्याच्या सध्याच्या स्थितीचे दर्शन घडवणारा एक मोठा फलक लावला आहे. हा बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यावर म्हंटले आहे, ‘उठा उठा निवडणूक आली, जुन्या रस्ते व पाखाड्यांची भूमीपूजने करण्याची वेळ आमदार खासदारांवर आली’, अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. शिवाय या बॅनर वर निवडणूक पूर्वी असलेले रस्ते आणि नंतरचे रस्ते यातील फरक दाखवण्यात आला आहे. तुरळ येथे महामार्गावर लावण्यात आलेला हा फलक लक्षवेधी ठरत असून चर्चेचा विषय बनला आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कडवई जिल्हा परिषद गटातील विकास कामांची भूमिपूजने करण्यात आली. तर काही ठिकाणी हळदीकुंकू कार्यक्रमाचे झाले. त्यानंतर रविवार 18 फेब्रुवारी रोजी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून भूमीपूजनाचा कार्यक्रम तुरळ झाला. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम स्थळी मनसेच्या वतीने लावण्यात आलेला हा फलक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.