कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
चिपळूण:-गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वेत विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत अपेक्षित नसलेले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या स्टॉलधारकांचे परवाने तातडीने रद्द करा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. तसे प्रसिध्दीपत्रक त्यांनी दिले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, एका व्हिडीओत विक्रेता वडापाववर पाय ठेऊन झोपला आहे, तर दुसऱ्या व्हिडीओत लादीवर पडलेली भजी पुन्हा जमा करून विकण्यासाठी जाणारा फेरीवाला दिसत आहे. या घटना लांछनास्पद आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, अन्न भेसळ अधिकारी व रेल्वे पोलीस झोपा काढत आहेत काय, असा संतप्त सवाल मुकादम यांनी केला आहे. फेरीवाल्यांची दर 6 महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करावी लागते. ती झाली आहे की नाही, याचा तपास करून ज्या स्टॉलधारकांचे हे फेरीवाले आहेत, त्यांच्या स्टॉलचा तातडीने परवाना रद्द करण्यात यावा व प्रवाशांच्या जीवाशी खेळून खाद्यपदार्थ विकणाऱ्या परप्रांतीयांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणीही मुकादम यांनी केली आहे.