रत्नागिरी: ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयात होणाऱ्या व्याधींपासून दूर राहण्यासाठी स्वतःची आचारसंहिता अमलात आणून निरामय आरोग्य जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन येथील परकार हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉक्टर अलीमिया परकार यांनी केले.
रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने मासिक स्नेह मेळावा मुख्य संयोजक श्री सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर परकार यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले, की ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या वृद्धत्वाच्या काळात आरोग्यदायी जीवनासाठी कोणती पथ्य पाळावीत हे सांगताना आहारावर संयम ठेवून हलका फुलका कडधान्य आणि फळांचा समावेश असलेला आहार घ्यावा. मधुमेहापासून दूर राहण्यासाठी गोड पदार्थ टाळावेत. नेहमीच चालण्याची सवय ठेवावी. मानसिक आजार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ताण तणावातून मुक्त होण्यासाठी आपल्या आवडीचे छंद जोपासावेत, असे मौलिक मार्गदर्शन केले.
प्रारंभी डॉक्टर दिलीप पाखरे यांनी डॉक्टर परकार यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांचा श्रीराम मंदिर कट्ट्याच्यावतीने श्री. अण्णा लिमये यांनी शाल श्रीफळ आणि शुभेच्छापत्र देऊन सन्मान केला. त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छापत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कट्ट्याचे प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मुखपत्र असलेल्या मनोहारी मनोयुवा या मासिकाचे वर्गणीदार होण्याचे आवाहन केले. त्यानंतर सचिव श्री. सुरेंद्र घुडे यांनी कट्ट्याच्या विविध उपक्रमांची माहिती दिल्यानंतर आभार प्रदर्शन केले.
यावेळी शिक्षक नेते श्री. कृ आ. पाटील गुरुजी, संजीवनी जामखेडकर निवृत्त डेपो मॅनेजर श्री. दिलीपराव साळवी, नंद प्रकाश बिर्जे, आप्पा वांदरकर, विनायक कवठणकर शिरीष वारंग आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याला ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती.
पुढील स्नेह मेळावा शनिवार दिनांक १६ मार्च २४ रोजी आयोजित करण्याचे जाहीर करण्यात आले.