गुहागर:-शिवजयंतीनिमित्ताने अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यावर आज भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे.
गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाने सोळाव्या शतकात बांधला.
शिवरायांनी १६६० मध्ये तो जिंकला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल आक्रमणात सिद्दी खैरातखानने तो १६९९ मध्ये जिंकला. त्यानंतर १७४४ मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्दीच्याच ताब्यात राहिला. या काळात सिद्दीने किल्ल्याचा विस्तार करून त्यात सुधारणा केल्या. नंतर तुळाजी आंग्रेनेही त्याचा विस्तार केला. त्यानंतर १८१८ साली कर्नल केनडी याने किल्ल्याचा ताबा घेतला आणि नंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तुळाजी आंग्रे कृष्णभक्त होते. त्यांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा याचे नाव गोपाळगड करण्यात आले. या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवतेज फाउंडेशन आणि गुहागरवासीयांनी पुढाकार घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन आणि गुहागरच्या नागरिकांतर्फे शिवजयंतीनिमित्ताने शिवपादुकांची रथयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता शृंगारतळीतून, तर १० वाजता गुहागर येथून शिवरथ यात्रा काढण्यात येणार आहे. गुहागर बसस्थानकावर मळण येथील शिवकालीन साहसी खेळांच्या कसरती सादर केल्या जाणार आहेत. कीर्तनवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर मंडळाकडून वारकरी परंपरेनुसार रिंगण घातले जाणार आहे. हेदवीतील विद्यार्थ्यांचे झांज पथक आणि दुचाकी फेरी मिरवणुकीची शोभा वाढवणार आहेत. बाजारपेठ मार्गे श्री देव व्याडेश्वर मंदिर, ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी मंदिरात रथ भेटीला जाईल. तेथून ११.३० वाजता वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन होईल. तेथे शिवरायांच्या पुतळ्याचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात पूजन आणि जगदंबेची भेट होईल. यावेळी गुहागर बाजारपेठ व वरचापाट, मोहल्ला, बाग याठिकाणी पादुकांचे पूजन केले जाणार आहे.
देवस्थानातर्फे प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तेथून शिवरथ यात्रा वरचापाट बाग, रानवी मार्गे अंजनवेलमध्ये दाखल होणार आहे. याच वेळी शृंगारतळी येथून निघालेली शिवरथ यात्रा पालपेणे, साखरीबुद्रुक, रानवी मार्गे अंजनवेल येथे पोहोचेल. त्यानंतर एकच शिवरथ यात्रा अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यावर जाईल. तेथे भगवा ध्वज फडकविल्यानंतर रथयात्रा समाप्त होणार आहे.