लांजा:-महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेतर्फे आज (दि. १७ फेब्रुवारी) एक दिवसाचे कोकणातील पहिले मराठी युवा साहित्य नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात लेखक, दिग्दर्शक, अभिनेता राजेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन पार पडेल.
संमेलनाच्या परिसराला कै. प्रभाकर पाध्ये साहित्य नगरी, तर रंगमंचाला नाटककार कै. ला. कृ. आयरे यांचे नाव देण्यात आले आहे. हे दोघेही लांजा तालुक्याचे सुपुत्र आहेत. सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ होईल. लांजा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक योजना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राहुल मराठे यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथदिंडी निघेल. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, संपादक विजय कुवळेकर
उद्घाटन सत्राचे अध्यक्ष असतील, तर मसापचे उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल.. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी ग्रंथ प्रदर्शनाचे, तर इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर ग्रंथ दालनाचे उद्घाटन करतील. उद्घाटन समारंभाला मसापच्या प्रमुख कार्यवाह सौ. सुनीताराजे पवार, लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, सीईओ भाऊसाहेब वंजारे, मसाप लांजा शाखेचे अध्यक्ष अॅड. विलास कुवळेकर, युवा साहित्य नाट्य संमेलनाचे निमंत्रक श्री. जयंत येलूलकर, लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, मसाप कोकण विभागाचे अध्यक्ष, प्रकाश देशपांडे, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी १२ वाजता कोकणातील नाट्य परंपरा काल, आज, उद्या या विषयावरील परिसंवाद रंगकर्मी, सिने अभिनेता राजेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यामध्ये लेखक-समीक्षक अनिल दांडेकर, प्रा. डॉ. राहुल मराठे आणि अमोल रंगयात्रीचे अमोल रेडीज सहभागी होतील.
दुपारी २ वाजता कथाकथनाचे सत्र गोवा कला अकादमीचे अध्यक्ष आर्यन कासारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेले विद्यार्थी कथाकथन करतील. त्यामध्ये सोनाली कदम, सानिया यादव, शार्दूल सावंत, स्वराली कनावजे, सिमरन शेख, स्वरा साळवी, वर्षा साटम या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
चौथे कविसंमेलनाचे सत्र दुपारी तीन वाजता सुरू होईल. त्याचे अध्यक्षस्थान मूळचे वाटूळ (ता. राजापूर) येथील आणि सध्या डोंबिवलीत राहणारे कवी-लेख विराज चव्हाण भूषवितील. कविसंमेलनात प्रिया मांडवकर, अमृता नरसाळे, स्नेहा रसाळ, प्रा. अनु्प्रिया प्रभू, प्रा. आरती शिंदे, कु. प्रज्ञा बाईत, कु. रोशनी गोंडाळ, कु. ऋतुजा शिंदे, कु. अपेक्षा बोलये, कु. इशिका कांबळे, कु. श्वेता जाधव, कु. शुभम जाधव, कु. मृण्मयी पाथरे, कु. सिद्धी रानडे, कु. आकांक्षा जाधव, कु. कौस्तुभ सुतार हे निमंत्रित कवी सहभागी होतील.
सायंकाळी ४ वाजता संमेलनाचा समारोप होईल. यावेळी लांजा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. आर. चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरुणांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित केलेल्या या संमेलनाचा आस्वाद साहित्य रसिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.