रत्नागिरी:-केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता साध्य करण्यासाठी दिनांक १२ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. माहे फेब्रुवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा प्रस्तावित सोळावा हप्ता वितरित करण्याचे शासनाचे नियोजन आहे.
या योजनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १६५०४८ लाभार्थी सहभागी असून यामधील ई-केवायसी प्रलंबित असलेले ३५५१, बँक खाते आधार संलग्न नसलेले १५४१८ लाभार्थी प्रलंबित आहेत. आधार सीडींगसाठी पोस्ट खाते, सामायिक सुविधा केंद्र व बँक व्यवस्थापन यांचे मदतीने तर ई-केवायसी करिता जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये नियुक्त केलेले ग्रामस्तरीय व्हिलेज नोडल अधिकारी (VNO) व सामायिक सुविधा केंद्र (CSCs) यांचेमार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. ई केवायसी आणि आधारसीडिंग प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी संबंधित तालुका कृषि अधिकारी तसेच आपले गावासाठी नियुक्त असलेले कृषि सहाय्यक यांचेकडे उपलब्ध आहे.
तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आणि ई-केवायसी व आधारसीडिंग प्रलंबित असलेल्या सर्व लाभार्थ्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. जालिंदर पांगरे यांचेकडून आवाहन करण्यात येते की, सदर संपृक्तता मोहिमे दरम्यान २१ फेब्रुवारी पर्यंत आपली प्रलंबित असलेली ई-केवायसी आणि आधारसीडिंग ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNO) व सामायिक सुविधा केंद्र (CSCs) यांचेशी संपर्क साधून पूर्ण करावी. जेणेकरून शासनाकडून प्रस्तावित देय असणारा सोळावा हस्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळेल