रत्नागिरी तालुक्याला मिळणार 1 वाहन व 8 पिंजरे
रत्नागिरी:-वानर, माकडांच्या बंदोबस्तासाठी जिल्हा नियोजन समितीकडून वनखात्याने केलेल्या 22 लाखांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसात गोळपमधून वानर, माकडांच्या धरपकड मोहिमेला सुरुवात केली जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
या बाबत वनखात्याकडून प्राप्त माहितीनुसार, वन्यजीव व्यवस्थापन निसर्ग संरक्षण या योजनेंतर्गत 22 लाखांचा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावात संपूर्ण जिह्याचा विचार करण्यात आला आहे. याच प्रस्तावाला आता पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी एम. देवेंदसिंह यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीकडून संपूर्णत: प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर आता रत्नागिरी तालुक्यासाठी लागणारा 16 लाख निधी प्राप्त झाला असून त्यानुसार मोहिमेची सुरुवात गोळपमधून होईल. यासाठी आवश्यक निधी व सामग्री ही रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून रत्नागिरी तालुक्यात वानर, माकडांना पिंजऱ्यात पकडण्यासाठी 8 पिंजरे व त्यांना पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी एक वाहनही उपलब्ध होणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर पुढील 15 दिवसात वानर, माकड पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील मोहीम फत्ते झाल्यावर त्याचा अभ्यास करून नंतर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी लागणारा निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी अविनाश काळेंना दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला नख लावणारी वानर, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्यात येणार आहेत. तालुक्यात जसजशी मागणी केली जाईल तसतशी ही मोहीम वनखात्याकडून आखण्यात येणार आहे.
या आधी अनेकदा अविनाश काळे आणि जिह्यातील शेतकऱयांनी एकत्र येत प्रशासन व शासनापुढे आपली मागणी ठामपणे मांडली आहे. त्याचीच फलश्रुती हा निर्णय म्हणता येईल. दरम्यान वानर, माकडांना पकडण्यासाठी जिह्याच्या वनविभागाकडून या आधीच महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले होते. ज्यानुसार वनविभागातील अधिकारी व कर्मचारी छत्रपती संभाजीनगर येथे 3 व 4 जानेवारी 2024 रोजी माकड, वानर यांचा उपद्रव कमी करण्यासाठी वानर, माकडांना पकडण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम पाठवण्यात आली होती. याशिवाय वानर, माकड यांना पकडण्यासाठी आवश्यक असलेले पिंजरे या विभागामार्पत बनवण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण पूर्ण करुन आल्यानंतर दापोली परिक्षेत्रातील केळशी येथे ग्रामपंचायतीसमोर 18 जानेवारी 2024 रोजी वानर, माकड पकडण्याचे प्रात्यक्षिक पिंजरा लावून करण्यात आले. त्यामध्ये यशस्वीरित्या माकड पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले व त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे ज्याप्रमाणे गोळप येथे काही दिवसांपूर्वी वन्यजीव रक्षक समाधान गिरी खास वानर, माकडांना पकडण्यासाठी आले होते. त्याच धर्तीवर आता वानर, माकडे पकडण्यासाठी वनविभागाचे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्यामुळे याचाही फायदा निश्चितच होणार आहे.