घरपट्टी भरा अन्यथा मालमत्ता सील करणार : मुख्याधिकारी बाबर
जिल्हा रुग्णालयाचे 16 लाख थकित
रत्नागिरी:-रत्नागिरी नगर परिषदेने घरपट्टी, पाणी पट्टी थकवणाऱ्याना दणका दिला आहे. थकित करपट्टी, पाणी पट्टी लवकरात लवकर भरा अन्यथा मालमत्ता सिल करणार असल्याचे नगर परिषदेने फर्मान काढले आहे. लवकरात-लवकर भरण्यास सहकार्य करावे, वेळेत पाणीपट्टी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शनही तोडले जातील, असा इशारा न.प. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिला आहे.
रिक्षा फिरवून ध्वनिक्षेपकाद्वारे वसुलीसाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरी अजूनही 60 टक्के घरपट्टी थकित आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी लवकरात लवकर वेळेत भरून नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी बाबर यांनी केले आहे.
रत्नागिरी नगर परिषद हद्दीत 30 हजार इमलेधारक आहेत. या साऱ्याकडून न.प.च्या तिजोरीत मालमत्तेपोटी एकूण वसुली 14 कोटीपर्यंत होत असते. आतापर्यंत 14 कोटींपैकी सहा ते साडेसहा कोटी रुपये वसुली झाली आहे. तर पाणीपट्टी 6 कोटींपैकी पावणेतीन कोटी वसूल झाली आहे. घरपट्टी, पाणीपट्टी साधारण 42 टक्के वसुली झाली आहे. पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट 6 कोटी आहे. त्यापैकी आतापर्यंत दोन ते पावणेतीन कोटी वसुली झाली आहे. वसुलीचा हा टक्का 40 ते 42 टक्केपर्यंत आहे. एकूण 10 हजार नळजोडणी धारकांकडून ही पाणीपट्टी वसूल केली जाणार आहे. परंतु अजूनही 60 टक्के पाणीपट्टी थकित आहे. त्यासाठी वसुली पथकांकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. वेळेत कर न भरल्यास संबंधिताची नळजोडणी तोडली जाईल, असाही इशारा न.प. मार्फत देण्यात आला आहे. साधारण मार्च महिन्यापर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
जिल्हा रुग्णालयाचे 16 लाख थकित
न.प. हद्दीतील विविध संस्थांची एकूण 1 कोटी 80 लाख कराची थकबाकी आहे. त्यामध्ये सर्वात जास्त कर थकबाकी जिल्हा शासकीय रुग्णालयाची 16 लाख रु. इतकी आहे. तसेच न्यायालय व अन्य शासकीय संस्थांचाही त्या खालोखाल समावेश आहे.