ग्रामपंचायत पातळीवरच कार्यवाही होणार, तालुक्याला जाण्याचा वेळ वाचणार
रत्नागिरी:-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)च्या कामावरील हजेरीपट (ई मस्टर) निर्गमित करण्याची जबाबदारी आता ग्रामरोजगार सेवकांवर देण्यात येणार आहे. यामुळे तालुकास्तरावर न जाता ग्रामपंचायत स्तरावरुन ई मस्टरचे हे काम केल्यास ही कामे वेळेत होण्यास मदत होणार आहे. याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द झाले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर या योजनेचे अभिलेखे व नोंदवह्या ठेवल्या जातात. या कामात ग्रामसेवकाला मदत करण्याची व संगणकीय माहिती इत्यादी भरण्यासाठी मदतनीस म्हणून ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेतल्या जातात. अभिलेख व नोंदवह्या ठेवण्याची व ग्रामसेवकांना सहाय्य म्हणून मदत करण्याची प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवकांची असते. मनरेगा अंतर्गत ग्रामसेवकाला मदत करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आल्या आहेत.
हजेरीपट ग्रामपंचायतस्तरावरुन निर्गमित करण्याबाबतची कार्यपध्दती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अवलंबल्यास मजुरांची मागणी प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरावर न जाता ग्रामपंचायतस्तरावरुन करुन हजेरीपटाची प्रत वेळीच घेतल्यास ग्रामरोजगार सेवकाला तालुकास्तरावर कामाच्या मागणीनुसार मजुराची यादी तालुक्याला पोहचवण्यासाठी लागणारा कालावधी तसेच ते प्राप्त करुन घेण्यासाठी लागणारा वेळ वाचेल.
हजेरीपट निर्मित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवकावर आल्याने सर्व ग्रामरोजगार सेवकांना एमएससीआयटी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष काम सुरु झाल्यानंतर 7 दिवसांच्या कामांच्या मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण भरलेले ई-मस्टर डेटा एंन्ट्री करावी लागेल. ग्रामरोजगार सेवकांना याविषयी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी जिल्हा एमआयएस समन्वयक यांच्याकडे देण्यात आली आहे.