लांजा:-तालुक्यातील बेनी बुद्रुक गावचे सुपुत्र तथा न्या.अजय माणिकराव खानविलकर यांची नुकतीच देशाचे लोकपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. बेनी बुद्रुक येथील ग्रामस्थांसह संपूर्ण लांजा तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची एप्रिल 2002 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी काही काळ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आणि नंतर नोव्हेंबर 2013 मध्ये ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयात गेले. मे 2016 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती, जिथे त्यांनी जुलै 2022 मध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. न्यायमूर्ती खानविलकर हे कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (2018) या खटल्यातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. या खटल्यामध्ये कलम 21 नुसार सन्मानाने मरण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, असे स्पष्ट करत टर्मिनल आजाराच्या बाबतीत रुग्णाला वैद्यकीय उपचार नाकारण्याची परवानगी दिली होती.
न्यायमुर्ती अजय खानविलकर यांची देशाचा लोकपालपदी नियुक्ती झाल्याचे समजताच बेनी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. बेनीबुद्रुक तथा संपूर्ण लांजा तालुक्या सारख्या ग्रामीण भागातील सुपुत्राणे उच्चपदाला गवसणी घालणे हे लांजा वासियांसाठी हे अभिमानास्पद असून अजय खानविलकर यांच्यावर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.