संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या अक्षय शिवाजी वहाळकर(तृतीय वर्ष, विज्ञान) आणि सुयोग चंद्रकांत रहाटे(द्वितीय वर्ष, बी व्होक- बँकिंग अँड फायनान्स) यांनी मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघातून नुकत्याच संपन्न झालेल्या ३७व्या आंतर विद्यापीठ पश्चिम विभाग युवा महोत्सव(शतस्पंदन)- २०२४ सहभागी होऊन भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथे संपन्न झालेल्या ‘शतस्पंदन-२०२४’ या युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठ संघांने फाईन आर्ट्स(उपयोजित कला) प्रकाराचे सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले.
‘शतस्पंदन-२०२४’ स्पर्धेत अक्षय वहाळकर याने रांगोळी मध्ये सुवर्णपदक, कोलाज मेकिंग मध्ये रौप्य पदक, तर सांघिक मांडणी शिल्प (इन्स्टॉलेशन) कला प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. सुयोग रहाटे याने सांघिक मांडणी शिल्प(इन्स्टॉलेशन) मध्ये सहभागी होऊन सुवर्णपदक पटकावण्यास हातभार लावला. मांडणी शिल्प सांघिक कला प्रकारात अक्षय व सुयोग सह आकाश स्थूल व कार्तिक कदम सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये मांडणी शिल्पासाठी विश्वास (FAITH), रांगोळी करिता स्पर्धकांना चार रंगात कोणत्याही विषयावर रांगोळी काढण्याची अनुमती देण्यात आली होती, तर कोलाज मेकिंग करीता निसर्ग चित्र(Landscape) हा विषय देण्यात आला होता.
अक्षय वहाळकर या वर्षासह सलग दुसऱ्या वर्षी मुंबई विद्यापीठ संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होत आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व कला मार्गदर्शक विलास रहाटे मुंबई विद्यापीठाच्या फाईन आर्ट संघाला सलग दुसऱ्या वर्षी मार्गदर्शन करत आहेत. मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाला विलास रहाटे यांच्यासह केशर चोपडेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक संघाला डॉ. सुनील पाटिल(संचालक, विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ) आणि निलेश सावे(सांस्कृतिक समन्वयक, मुंबई विद्यापीठ) यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संसाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विकास शृंगारे आणि सहकारी, कलाशिक्षक सुरज मोहिते, प्रा. धनंजय दळवी आणि ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.