मुंबई:-बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागातील दामोदर नाट्यगृह आणि सोशल सर्व्हीस लीगच्या शाळेला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली.
दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणी प्रकल्प अंतर्गत १ हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारण्यात येईल, असे आश्वासन प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केसरकर यांनी दिले. दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणी प्रकल्पांतर्गत सुधारीत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी राज्य शासनाच्या संबंधित विभागांना दिल्या.
यावेळी आमदार प्रवीण दरेकर, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त (एफ दक्षिण) महेश पाटील, शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ आदीजण यावेळी उपस्थित होते.
मराठी संस्कृती आणि नाट्य संस्कृतीची परंपरा जपण्याचे काम गत अनेक वर्षांपासून दामोदर नाट्यगृहाच्या माध्यमातून झाले आहे. तसेच सोशल सर्व्हीस लिगच्या माध्यमातूनही चांगले काम झाले आहे. म्हणूनच दामोदर नाट्यगृह हे पुन्हा एकदा दिमाखात उभारायला हवे. पुनर्बांधणीत ८०० आसन क्षमतेचे सभागृह प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु, याठिकाणी १ हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारण्यात यावे, अशी सूचना केसरकर यांनी केली. तसेच सुधारित आराखडा सादर करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सुधारित प्रस्तावाला बृहन्मुंबई महानगरपालिकेची यथोचित मान्यता मिळाल्यानंतर दामोदर नाट्यगृह आणि शाळा अशा दोन्ही वास्तुंच्या उभारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही दोन्ही बांधकामे एकाचवेळी सुरू करण्यात यावी, अशीही सूचना केसरकर यांनी संबंधित विभागांना केली. तसेच सहकारी मनोरंजन मंडळालाही केसरकर यांनी या दौऱयात भेट दिली. या संस्थेलाही १ हजार चौरस फुटाची जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केसकर यांनी दिल्या. बच्चूभाई इमारतीच्या बांधकामासंदर्भात अनेक रहिवाशांनी पालकमंत्री केसरकर यांची भेट घेतली. परळच्या दामोदर सभागृह परिसरातील विविध वास्तुंच्या पुनर्बांधणीच्या निमित्ताने स्थानिक पदाधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱयांसोबत केसकर यांनी आढावा बैठक घेतली.
दामोदर नाट्यगृह दिमाखात उभे राहण्यासाठी प्रयत्न करणार – केसरकर
