मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ साली काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवून नवा इतिहास रचला होता. हाच इतिहास मोठ्या पडद्यावर ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अभिनेत्री यामी गौतम हिची या चित्रपटात प्रमुख भूमिका असून सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाचे लेखन आदित्य जांभळे आणि दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपटात यामी एका दमदार एनआयए ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच काश्मीरच्या नयनरम्य दृश्यापासून करण्यात आली आहे. यात यामीचा संवाद आहे की, “काश्मीर इज लॉस्ट केस…जोपर्यंत हे स्पेशल राज्य आहे आपण त्याला हातही लावू शकत नाही.” तिचे संवाद ऐकून अंगावर काटाच येतो. कथानकाबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटात काश्मीरमधून ‘आर्टिकल ३७०’ कलम हटवण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीपासून ते कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये काय काय परिस्थिती होती, काश्मिरी लोकांचे काय हाल झाले, आतंकवाद कसा वाढला ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला हे सर्व टप्पे दाखवण्यात आले आहे.
महत्वाची बाब म्हणजे, यामी गौतमचा हा पहिला एक्शन चित्रपट असून त्यासाठी तिने योग्य प्रशिक्षण घेतले होते. ती गरोदर असतानाच हा चित्रपट चित्रित झाल्याचे देखील तिने ट्रेलर लॉंचवेळी सांगितले. या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अभिनेते अरुण गोविल यांनी साकारली आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेते मनोज जोशी दिसत आहेत. याशिवाय अभिनेत्री प्रिया मणि, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, वैभव तत्ववादी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. जिओ स्टुडिओज आणि बी६२ निर्मित ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट देशभरात २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
बहुचर्चित ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
