दापोली:-मिशन आपुलकी आणि शैक्षणिक उठाव योजनेअंतर्गत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चंद्रनगर मराठी शाळेला हार्मोनियम, डग्गा व तबला भेट स्वरूपात मिळाला आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रूपेश बैकर यांच्या प्रयत्नांतून शाळेस ही भेट मिळाली आहे.
चंद्रनगर मराठी शाळेचे विद्यार्थी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये चमकत आहेत. सलग दोन वर्षे या शाळेतील विद्यार्थी इस्रोच्या भेटीसाठीही पात्र ठरले आहेत. शाळेची प्रगती व कीर्ती सर्वत्र पसरली असतानाच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनीही आता शाळेत विविध सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी मदतीचा हात पुढे करणे सुरू केले आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रूपेश बैकरदेखील शाळेच्या सोयीसुविधांसाठी सतत प्रयत्न करीत असतात.
त्यांच्याच प्रयत्नातून शाळेचे माजी विद्यार्थी असलेले प्रदीप मिसाळ व त्यांचे मुंबईस्थित मित्र सतीश शेट्टी, वसंत शेट्टी, संदीप सावंत यांच्या सहकार्यातून चंद्रनगर शाळेची सांस्कृतिक गरज ओळखून शाळेस हार्मोनियम, डग्गा व तबला भेट देऊन शाळेच्या मिशन आपुलकी अभियानास हातभार लावला आहे. एका छोटेखानी कार्यक्रमात या दात्यांनी या वस्तू शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत.
मिशन आपुलकी अभियान व शैक्षणिक उठाव योजनेअंतर्गत शाळेतील शिक्षक मानसी सावंत, बाबू घाडीगावकर, मनोज वेदक, अर्चना सावंत आदी सर्व नेहमीच प्रयत्नशील असतात. शाळेतील विद्यार्थी व पालक त्यांच्या वाढदिवसानिमित्तही शाळेस वस्तुरूप भेट देत असतात. हार्मोनियम, डग्गा व तबल्यासारखी संगीत वाद्ये शाळेस दिल्याबद्दल मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी सर्व दात्यांचे आभार मानले आहेत.