राज्यसभा निवडणूक होईपर्यंत म्हणजे २७ फेब्रुवारीपर्यंतच वैध
नवी मुंबई:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. त्यानंतर आता शरद पवार यांच्या गटाला ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं नाव देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाकडून मागवलेल्या नावापैकी या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे शरद पवार गटाला दिलेलं नवं नाव हे राज्यसभा निवडणूक होईपर्यंत अर्थात २७ फेब्रुवारीपर्यंतच वैध असणार आहे.
अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. त्यानंतर शरद पवार गटाला नवीन नाव आणि निवडणूक चिन्हाची आवश्यकता होती. तसेच आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात नवीन नाव आणि चिन्ह द्यावे, अशी विनंती शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार आज, बुधवार दुपारपर्यंत नवा पक्ष स्थापन करण्यासाठी पर्याय देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्याप्रमाणे शरद पवार गटाकडून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार आणि एनसीपी – शरद पवार, अशा नावांचे पर्याय देण्यात आले होते. अखेर आयोगाने ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या नावावर शिक्कामोर्तब केले.