रत्नागिरी:-येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या नूतन अधिक्षक म्हणून डाॅ. संघमित्रा फुले यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी या रूग्णालयाच्या सर्व कामकाजाचा आढावा घेतला.
दुपारनंतर त्यांनी दापोली उपजिल्हा रूग्णालयात जाऊन मानसिक आरोग्य विभागाचाही आढावा घेतला.
रत्नागिरीच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून डाॅ. संघमित्रा फुले यांची येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या अधीक्षकपदी बदलीने नियुक्ती झाली आहे. बुधवारी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर येथील वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संजय कलकुटगी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर अधीक्षक डाॅ. संघमित्रा फुले यांनी या रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक घेऊन सविस्तर माहिती घेतली. या रूग्णालयात कायमस्वरूपी रहाणाऱ्या रूग्णांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करून त्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्याबाबत सुचना दिल्या. तसेच सर्व रूग्णांची पाहाणी केली.
सर्वांच्या सहकार्यानेच रूग्णालयाचे काम पुढे जाणार आहे. त्यामुळे सहकार्याची गरज असल्याचे आवाहन डाॅ. फुले यांनी केले. प्रादेशिक मनोरूग्णालयात अपुरे मनुष्यबळ असल्याने कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याबाबतच्या सुचनाही डाॅ. फुले यांनी दिल्या.सध्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याबाबतही डाॅ. संघमित्रा फुले यांनी कोणते कोणते उपक्रम राबविले जात आहेत, त्याचा आढावा घेतला.