पुणे:-सध्या देशभरात वन्य प्राण्यांच्या संदर्भात जगात कुठेही अमलात नाही अशी अशास्त्रीय, अन्याय्य व्यवस्था लागू केली आहे. त्याविरुद्ध आता प्रथमच काही आवाज उठू लागले आहेत.
त्यामुळे आपल्या भागात वन्यजीवांचे हाल होत असतील, तर समाजमाध्यमांवर त्याचे छोटे व्हिडीओ व्हायरल केल्यास जनजागृती वेगाने होऊन नागरिक मदतीला धावून येतील, असे आवाहन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले आहे.
डॉ. गाडगीळ यांनी पाठवलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, 7 डिसेंबर 2023 रोजी कर्नाटकच्या विधानसभेत आमदार अरगा ज्ञानेंद्र यांनी शेतकर्यांना रानडुकरे, माकडे आणि गवे यांची भयानक पीडा होत असून, लोकांना रानडुकराचे मांस खाण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन केले. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील गोळपमधील अविनाश काळे यांनी वानर आणि माकडांच्या उपद्रवाविरुद्ध शासनाने कायमचा बंदोबस्त करावा म्हणून 25 जानेवारी रोजी पदयात्रा सुरू केली. यावरून एकूणच लोकशक्ती जागृत होत आहे, असे दिसते, ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे.
समाजमाध्यमांचे काम प्रभावी ठरतेय
सामाजिक माध्यमे सध्या खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या माध्यमांवर छोट्या- छोट्या दोन-अडीच मिनिटांपर्यंतच्या व्हिडीओ क्लिप्स खूप परिणामकारक ठरत आहेत. त्यामुळे पुढचे पाऊल म्हणून जमिनीवर काय घडत आहे ते दाखवले पाहिजे. स्वीडनसारख्या देशात कशा पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. त्यातून भरपूर संख्येने मांस शिल्लक राहून केवळ त्या मुद्दलावरचे व्याज हे शिकारीच्या रूपाने वसूल केले जाते, हे मांडणार्या, तसेच मालमत्तेत आक्रमण करणार्या माणसाला स्वसंरक्षणार्थ ठार मारले तर तो गुन्हा नाही. पण रानडुकराला ठार मारले तर तो गुन्हा आहे, ही प्रणाली कशी घटनाबाह्य आहे, हे विशद करणार्या अशा निरनिराळ्या व्हिडीओ क्लिप्स बनवून त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
या व्यापक कामाचे स्वरूप नीट ठरवले पाहिजे. मगच अशी मोहीम हातात घेतली पाहिजे. मी अशा मोहिमेत आनंदाने सहभागी होईल, त्यासाठी काही प्रमाणात आर्थिक योगदान पण करेन. तेव्हा सर्व समविचारी लोकांनी एकत्र येऊन या मोहिमेचे स्वरूप ठरवावे आणि ती हाती घ्यावी, अशी माझी कळकळीची
विनंती आहे.– डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, पुणे.