संगमेश्वर:-२५ जानेवारी, २०११ पासून दरवर्षी २५ जानेवारी या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक वर्षात मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदार यादी अद्यावतीकरण व नाविण्यपूर्ण उपक्रमांचे समाधानकारक काम केल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये विधानसभा मतदार संघानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना ‘उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. यावर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव संगमेश्वरच्या तहसीलदार श्रीम. अमृता साबळे यांनी प्रजासत्ताक दिनी केला. याप्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार मिलिंद सावंतदेसाई, नायब तहसीलदार सुदेश गोताड यांची उपस्थिती होती.
संगमेश्वर तालुक्यात एकूण तीन विधानसभा मतदार संघ येतात. त्यानुसार वर्ष २०२४चे विधानसभा मतदार संघनिहाय मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये २६७ राजापूर विधानसभा मतदार संघामधून शिक्षक शिवाजी काळे यांना चाफवली क्षेत्रासाठी, तर २६६ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ संगमेश्वर तालुक्यामधून अंगणवाडी सेविका सुखदा शिंदे यांना लोवले क्षेत्रासाठी तहसीलदार श्रीम. अमृता साबळे यांनी सन्मानित केले. याच कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेतील यशस्वी कलाकार साई सनगरे, मानसी कुवडे, निरंजन सागवेकर आणि तेजल भाटकर यांचाही सत्कार तहसीलदार अमृता साबळे यांनी केला.
उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुरस्कार २६५-चिपळूण विधानसभा मतदार संघातील संगमेश्वर तालुक्यातील शिक्षक विलास कानर यांना मोर्डे क्षेत्रासाठी मा. श्री. कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर २६५-चिपळूण विधानसभा मतदार संघ संगमेश्वर तालुक्यातील शिक्षक प्रवीण भोसले यांना निवे बुद्रुक क्षेत्रासाठी मा. श्री.आकाश निगाडे, उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तहसीलदार कार्यालय, संगमेश्वरच्यावतीने मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा गौरव
