वांझोळे:-आता लढा वांझोळे मोर्डे रस्त्यासाठी, पंधरा वर्षे खड्ड्यात गेली,रस्त्याला डांबर नाही!नागरिकांना पंधरा वर्षापासून रस्त्याच्या दुरावस्थेला सामोरे जावे लागत आहे असे म्हणत गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या माध्यमातून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जवाब दो धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
12 फेब्रुवारी 2024 रोजी वांजोळे येथे गाव विकास समितीच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारला जाणार आहे.
पंधरा वर्षापासून तुम्ही हा रस्ता खड्ड्यात का ठेवला?येथील नागरिकांना तुम्ही गृहीत धरता का?वांझोळे – मोर्डे – कनकाडी – दाभोळे असा मुख्य असणारा हा रस्ता गेली पंधरा वर्षे खड्ड्यात असून त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे,उपाध्यक्ष मंगेश धावडे ,सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले ,राहुल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्डे – करंबेले ग्रामपंचायतचे सदस्य नितीन गोताड हे धरणे आंदोलन करणार आहेत.या आंदोलनाला गाव विकास समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.१५ वर्षे हा रस्ता खड्ड्यात आहे.अतिशय खराब झालेला हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा व रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे गाव विकास समितीचे नितीन गोताड यांनी सांगितले.