चिपळूण:-एकच पर्व बहुजन सर्व… नही चलेगी ‘नही चलेगी, दादागिरी नही चलेगी…, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे…, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, तुमचं आमचं नातं काय जय तुकोबा जय शिवराय…, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो… अशा गगनभेदी घोषणांनी बुधवारी चिपळूण शहर दणाणून गेले.
कुणबी बहुजनांच्या प्रलंबित विविध मागण्या आणि ओबीसी आरक्षणातील घुसखोरी रोखण्यासाठी कुणबी बहुजन समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. आपल्या न्याय हक्कासाठी शेकडो दुचाकींसह शहरातून काढलेला ओबीसी निर्धार मोर्चा विराट ठरला. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण व्हावे, मराठा समाजाला सरसकट कोणीबी दाखला देण्यात येऊ नये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे स्व शामराव पेठे आर्थिक विकास महामंडळ 500 कोटींचा निधी त्वरित देण्यात यावा या मागणीसाठी चिपळूण तालुक्यातील ओबीसी बहुजन समाजाने कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मौर्चा काढला. सकाळी ११ वाजता नगर पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरूवात झाली. शेकडो तरूण, समाज बांधव व महिला या मोर्चात सहभागी झाल्या. शहरातील न.प.पासून दुचाकी, चारचाकीसह हा मोर्चा चिंचनाका, मार्कंडी, काविळतळी, बहादूरशेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डीबीजे कॉलेजपासून प्रांत कार्यालयावर धडकला. समाज बांधवांच्या हातात यावेळी झेंडे झळकत होते. व प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. या मोर्चात चिपळुणातील विविध समाजातील पदाधिकाऱ्यांनी सहभागी होत आपला पाठिंबा दिला.
प्रांत कार्यालय येथे झालेल्या सभेत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्यासह पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, कुणबी सेनेचे प्रदीप उदेग यांच्यासह यांनी मार्गदर्शन केले. भर उन्हातही या मोर्चाला मोठी गर्दी झाली होती. यानंतर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कुणबी समाज बांधवांनी शांततेत हा मोर्चा यशस्वी केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी कुणबी समाजातील ज्येष्ठ नेते दादा बैकर, राष्ट्रवादीचे दादा साळवी, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष रतन पवार, कुणबी सेनेचे संजय जाबरे, राजेंद्र पवार, यांच्यासह रामपूर, मार्गताम्हाने विभागासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.