स्थानिकांनी दिला आंदोलनाचा इशारा; डागडुजी न झाल्यास १ जानेवारीला रास्ता रोको
संगलट,खेड/इक्बाल जमादार:- मुळचा पंढरपूर-भोर- मंडणगड तालुक्यातील वेळास- बाणकोट या मार्गावरील राजेवाडी फाटा ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गावरील महाड-म्हाप्रळ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे वारंवार अपघाताची शक्यता निर्माण होत. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे स्थानिक कोकण श्रमिक संघटना जनता यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रस्ता धोकादायक बनला असून रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. महाड प्रांताधिकारी तसेच संबंधित विभागांना कोकण श्रमिक संघ खाडीपट्टा विभाग तुडील, चिभावे व नडगाव यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे इशारा पत्र नुकतेच देण्यात आले असून पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे शिरगाव ते ओवळे फाटा
या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत त्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून सुद्धा संबंधित ठेकेदार यांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
खाडीपट्टयाच्या संघटनेची व जन तेची मागणी आहे, की शिरगाव ते सव या गावपर्यंत अखंड डांबरी कार्पेट करून मिळावे आणि उर्वरित सव ते ओवळे पर्यंत डांबरी पॅचेस भरुन मिळावेत कारण या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, आजारी, रुग्ण, गरोदर महिला वयोवृद्ध स्त्रिया, पुरुष तसेच सर्व दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहन चालकांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. अंबाडवे ते राजेवाडी फाटा राष्ट्रीय महामार्ग होईल तेव्हा होईल, सध्या तरी या रस्त्यावरून जाता येता अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे, त्यातून काही गंभीर अपघात होऊन मृत्यू देखील ओढावत आहेत.
महाड प्रांताधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून संबंधित विभागास व ठेकेदारास सक्त सूचना देऊन येत्या चार दिवसात निर्णय घेऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
५ किमीच्या अंतरासाठी लागतोय एक तास
म्हाप्रळ ते महाड हे अंतर २५ कि.मी. चे असून वाहन साधारण गतीने चालविल्यास अर्धा तास या प्रवासाकरता लागू शकतो, मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एक तासापेक्षा जास्त वेळ खर्च घालवून खड्यांशी सामना करीत येथील नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. मार्गावर दुपदरी रस्त्याचे काम देखील गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याने अनेक अडथळ्यांचा सामाना वाहन चालकांना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता अरुंद असून रस्त्याच्या कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मातीचे भराव, डबर, दगड आणि गोटे ठेवले गेले असल्याने त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोकण श्रमिक संघटनेने दिलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या इशाऱ्याने महाड प्रांताधिकारी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून संबंधित ठेकेदारांना देखभाल दुरुस्ती करायला भाग पाडते का? याकडे सान्या खाडीपट्टावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. अन्यथा कोकण श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह, सर्व सदस्य तसेच खाडीपट्टयातील सर्व नागरिक रस्त्यावर उतरून रास्ता रोको करतील यामध्ये तीळमात्र शंका नसल्याचे कोकण श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने गोठे येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. आणि या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठेकेदार व प्रशासनाची असेल याची कृपया नोंद घेऊन या निवेदनाची दखल घ्यावी अशी विनंती या इषारापत्राद्वारे संघटनेनी प्रशासनाला केली.