चिपळूण/प्रतिनिधी:- चतुरंग प्रतिष्ठानच्या चिपळूण केंद्राचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि समग्र चतुरंग संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष एकाच वेळी, एकत्रितरित्या साजरे करण्याच्या उद्देशाने चतुरंगने ‘रुपेरी सोनेरी रंगसोहळा’ या भव्य स्वरूपी एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यामध्ये पखवाजगुरु कृष्णा साळुंके यांची पखवाज जुगलबंदी… पं.आनंद भाटे यांची गायन मैफल… नृत्यगुरु सोनिया परचुरे यांचा ‘भगवती’ हा देवी-नृत्य-यज्ञ (बॅलेनृत्य)… आणि पं. रोणू मुजुमदार(बासरी), पं.भवानी शंकर(पखवाज) व पं.अरविंद आझाद (तबला) यांची एकत्रित वादन मैफल व सोबत दोन दर्जेदार सोहळे अशी भरगच्च कार्यक्रमांची रचना आहे.
या सर्व कलारंगांचा आस्वाद, चिपळूण केंद्राच्या ‘आस्वादयात्रा’ योजनेतील सभासद रसिकांनाही घेता यावा/मिळावा अशी आग्रहवजा विनंती योजनेतील अनेक सभासद रसिकांनी संस्थेकडे केली. त्यावर साधक-बाधक योग्य असा विचार करून चतुरंग प्रतिष्ठानने घेतलेल्या निर्णयानुसार, आता आस्वादयात्री योजनेतील सभासदांनाही या योजनेअंतर्गतच रंगसोहळ्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि खास कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे… या निर्णयानुसार सर्व संबंधित सभासदांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवर सूचनावजा निरोप पाठवलेला असून, हे कार्यक्रम आस्वादयात्रा योजनेअंतर्गत कसे समाविष्ट केले जातील याचा खुलासा करणारे स्वतंत्र निवेदन पत्रकही मोबाईलवर व्हॉट्सअप द्वारा पाठविलेले आहे. प्रस्तुत आवाहनाद्वारे सर्व सभासदांना चतुरंग प्रतिष्ठान कडून कळविण्यात येत आहे की, सर्व आस्वादयात्री सभासदांनी या आंखणीनुसार केलेल्या आवाहनाप्रमाणे, रंगसोहळा कार्यक्रमांचे, आरक्षित ठेवलेल्या कक्षातील, आपले आसन क्रमांक चतुरंग प्रतिष्ठान कार्यालयात (बुरूमतळी, वृंदावन लॉजसमोर, सारस्वत बँकेच्या वर… येथे) प्रत्यक्ष येऊन आणि आपले सभासद कार्ड दाखवून कृपया, गुरुवार २१ डिसेंबर ते शनिवार २३ डिसेंबर या तीन दिवसातच घेऊन जावेत.